Youth Speak

The Madras Chronicle

पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. Hello once again. फिर एक बार प्रणाम । மீண்டும் வணக்கம் (मीण्डुम् वणक्कम्).

 

तर, मागच्या महिन्यात मी मद्रास शहराबद्दल तुम्हाला सांगितलं (कारण मी तेवढंच फिरलो होतो 😅). या महिन्याभरात मी माझ्या कक्षा जरा रुंदावल्या आणि शहराबाहेरचीही काही ठिकाणं फिरून आलो. हे सगळं मी (अर्थात !) एकट्यानेच फिरलो आणि फिरू शकलो कारण, एकतर अतिपहाटे निघण्याच्या माझ्या सवयीमुळे कोणी माझ्याबरोबर यायला राजी होत नसे. आणि दुसरं म्हणजे मी ३ दिवसात तमिळ भाषा लिहायला आणि लिहिलेलं वाचायला शिकलो. तमिळ वाचता येऊ लागल्याने ‘समोरुन येणारी बस कुठे जाणार?’ या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मला इतरांच्या मदतीची गरज पडत नव्हती. आणि जेव्हा संभाषण करण्याची वेळ यायची तेव्हा सुरुवातीलाच मी हुकुमी एक्का बाहेर काढायचो, तो म्हणजे “எனக்கு தமிழ் தெரியாது (एनक्कु तमिळ तेरियादु)”. याचा अर्थ, ‘मला तमिळ समजत नाही’. (😂😂😂). हे समोरच्याला, त्याच्या मातृभाषेत एकदा सांगितलं, की तो एकतर स्वतः इंग्रजीत किंवा हिंदीत बोलतो, किंवा हिंदी-इंग्रजी येणा-या माणसाला बोलावतो. (याचे बरेच किस्से आहेत. पण ते सगळं इथे नको.)

 

तर, मी explore केलेली दोन महत्तावाची ठिकाणं म्हणजे कांचीपुरम् (कांजीवरम् हे अपभ्रंश होऊन प्रसिद्ध झालेलं नाव आहे) आणि रामेश्वरम्. याव्यतिरिक्त मी मद्रासमधल्या आणखी काही ठिकाणी भेटी दिल्या, त्याबद्दलही सांगतो. कांचीपुरम आणि रामेश्वरम फिरल्यानंतर मला, यापुढे कुठेही फिरताना उपयोगी पडतील असे काही चांगले आणि काही शिक्षित करणारे अनुभव मिळाले.

 

(मी अजून परतलो नसलो तरी माझी खरेदी करून झाल्यामुळे त्याबद्दलचे संदर्भ पूर्ण भूतकाळात आहेत).

 

इथे training संपवून मुंबईला परत येताना मला रिकाम्या हाताने यायचं नव्हतं. अगदी एकूण एकासाठी शक्य नसलं, तरी घरच्यांसाठी, मित्र-मैत्रिणींसाठी मला Something from Chennai असं काहीतरी खरेदी करायचं होतं. मग ‘काय बरं खरेदी करावं?’ याचा विचार करताना मला शाळेत भूगोलात शिकलेला ‘भारतातील उद्योग आणि व्यवसाय’, हा धडा आठवला. त्यात वस्त्रोद्योगाबद्दल सांगताना लिहिलेलं एक वाक्य ‘कांजीवरम हे तामिळनाडूमधील रेशीम उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे.’ मग ठरवलं की silk च्याच काही वस्तू घेऊन जायचं. मग दुकानांची शोधाशोध सुरू केली. जिथून जिथून दुकानांची यादी जमवता येईल त्यांच्याकडून जमवली. (यामध्ये महाराष्ट्र मंडळातले सदस्य, Ola चे drivers, Hostel च्या मालकाची बायको, मित्रांच्या मातोश्री, company मधले local staff इत्यादी सर्वांचा समावेश आहे). त्या दुकानांच्या मद्रासमधील branch मध्ये गलो. मग कळलं की कांचीपुरमपर्यंत local train जाते. तेव्हा मग तिथले silk चे दर जाणून घेण्यासाठी आणि फिरण्याची हौस पुरी करण्यासाठी १५ आँगस्टच्या पहाटे ५.०० वाजता निघालो.

 

चेन्नईपासून कांचीपुरमसाठी लोकल असल्या तरी त्यांची frequency २ तासाने १ इतकी कमी आहे. तरी C.M.B.T. (कोयंबेडू) भागात असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकातून राज्यभर तसेच राज्याबाहेर देशभर जाणा-या सरकारी आणि private बसेस निघतात. तिथून कांचीपुरसाठीची बस सहज मिळून जाते. माझ्यासाठी, मी राहतो ते कारपाकम, ते तांबरम Railway Station आणि तिथून ‘तिरुमालपुर’ला जाणारी लोकल, हा मार्ग माझ्यासाठी सोयीचा होता. (कांचीपुरमच्या पुढचं स्टेशन तिरुमालपुर.)

 

“जर तुमच्या मार्गात अडथळे येत नसतील तर तुम्ही तुमचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरुन करत आहात”, या स्वामी विवेकानंदांच्या वाक्याचा प्रत्यय मला त्यादिवशी दुस-यांदा आला, आणि वेळोवेळी येत राहिला. (याहीबद्दल पुन्हा केव्हातरी.) नेहमीप्रमाणे पहाटे ५.०० वाजता निघालो. या हिशोबानुसार मी कांचीपुरममध्ये ८.३० ला पोहोचणं अपेक्षित होतं पण वर उल्लेखलेल्या काही अडथळ्यामुळे मी १०.४५ ला पोहोचलो. कांचीपुरम हे रेशमी कापडाशिवाय तिथे असलेल्या कामाक्षी अम्मन आणि वैकुंठ पेरुमल या दोन देवळांसाठीही प्रसिद्ध आहे.

 

कामाक्षी मंदिर हे पल्लव घराण्यातील राजांनी बांधले आणि इ.स. ८ व्या शतकात आदि शंकराचार्यांनी इथे  श्रीचक्राची स्थापना केली. इथली श्रीलक्ष्मीदेवीची मूर्ती कमलासनस्थ मुद्रेत आहे. (इतर देवळांतील मूर्तींमध्ये लक्ष्मीदेवी कमळामध्ये उभ्या मुद्रेत असतात.)

 

‘वैकुंठ पेरुमल’ याचा अर्थ आहे ‘स्वर्गाचे सौंदर्य’.  हे भगवान विष्णु आणि श्रीलक्ष्मी (आनंदवल्ली) यांचे स्थान आहे. या देवळाचे बांधकाम द्राविडी पद्धतीचे असून इ.स. १० व्या शतकात पल्लव आणि चौळ घराण्यातील राजांनी ते करवून घेतले. (दुपारी १२.३० ते ४.०० दरम्यान देऊळ बंद असल्यामुळे मला गाभा-यात प्रवेश मिळाला नाही). या वास्तूचे स्थापत्य, सर्वसाधारण मंदिरांच्या designशी (मला तरी) मिळतं जुळतं वाटत नाही. ते आश्रम किंवा लेण्याशी अधिक मेळ खातं.

 

या दोन मोठ्या स्थानांशिवाय इथे विष्णुची १००८ आणि शंकराची १०८ लहानमोठी देवळं आहेत, असं म्हणतात.

 

आता इथे ‘वदनी कवळ’ कुठे घ्यायचे ते सांगतो. कांचीपुरममध्ये रेस्टोरंट तुरळकच आहेत पण उत्तम दक्षिण भारतीय थाळी देणा-या अनेक खानावळी आहेत. पर्यटन स्थळ असूनही हे शहर पूर्णतः विकसित नाही, आणि म्हणूनच इथलं खरं सौंदर्य आजही टिकून आहे. मी सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण दोन्ही रेल्वे स्टेशनपासून साधारण ५०० मीटरवर असलेल्या ‘GREEN CAFE’ या हाँटेलमध्ये घेतलं. Hi Tech बांधकाम नसूनही तिथली स्वच्छता आणि खाण्याची चव, या दोन गोष्टींमुळे माझे पैसे वसूल झाले.

 

कांचीपुरममध्ये विशेषतः silk खरेदी करताना तुम्हाला जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे. याचं कारणही आता सांगतो. इथे silk चा व्यवसाय करणारे २ प्रकारचे व्यावसायिक आहेत. एक, ज्यांचे स्वतःचे माग (सोप्या शब्दात सांगायचं तर looms) आहेत. दुसरे trade करणारे. दुस-या categoryतल्या लोकांच्या दुकानात गेलात तर खिसा कापलाच म्हणून समजा. जी वस्तू ३०० रुपयाला मिळते, त्याचा भाव हे लोक ९०० रुपये लावतात. (मी स्वतः हा अनुभव घेतलाय. माझं आर्थिक नुकसान होतंय हे लक्षात येताच मी काहीही खरेदी न करताच दुकान सोडून निघालो). बाकी कांचीपुरम आणि चेन्नईतल्या दरात काहीही फरक नाही.

 

तेव्हा silk खरेदी चेन्नईतच करणे फायदेशीर आहे, कारण

१. चेन्नई – कांची – चेन्नई प्रवासाचा वेळ वाचेल.

२. मोठी खरेदी असेल तर transport cost, कष्ट कमी लागतील.

३. Trade business करणा-यांची दुकानं चेन्नईत नाहीत. तेव्हा ग्राहक म्हणून फसवणूक होणार नाही.

 

तर अशी होती कांचीपुरमची ONE DAY TRIP.

 

नमामीशमीशाननिर्वाणरूपं

विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् ।
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं

चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् ॥ १॥

निराकारमोंकारमूलं तुरीयं

गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् ।
करालं महाकालकालं कृपालं

गुणागारसंसारपारं नतोऽहम् ॥ २॥

तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरं

मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् ।
स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा

लसद्भालबालेन्दु कण्ठे भुजङ्गाः ॥ ३॥

चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं

प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् ।
मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं

प्रियं शंकरं सर्वनाथं भजामि ॥ ४॥

प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम्

अखण्डमजं भानुकोटिप्रकाशम् ।
त्रयःशूलनिर्मूलनं शूलपाणिं

भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम् ॥ ५॥

कलातीतकल्याणकल्पान्तकारी

सदा सज्जनानन्ददाता पुरारी ।
चिदानन्दसन्दोहमोहापहारी

प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी ॥ ६॥

न यावत् उमानाथपादारविन्दं

भजन्तीह लोके परे वा नराणाम् ।
न तावत् सुखं शान्तिसन्तापनाशं

प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम् ॥ ७॥

न जानामि योगं जपं नैव पूजां

नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् ।
जराजन्मदुःखौघतातप्यमानं

प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो ॥ ८॥

     ॥ इति श्रीगोस्वामितुलसीदासकृतं श्रीरुद्राष्टकं सम्पूर्णम्

 

(वरची आठही कडवी न वाचता इथे आल्याबद्दल धन्यवाद. कृपया त्याची नाममुद्रा तरी वाचा). आता इथे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, की तमिळमध्ये सुरुवात करणा-या ह्याने अचानक हे एवढं संस्कृत काव्य का लिहिलंय? ह्यालाही कारण आहे. खरं तर अब्दुल कलामांच स्मारक बघण्यासाठी रामेश्वरमला जायचा विचार मुंबईहून निघतानाच माझ्या डोक्यात होता. पण चेन्नई-रामेश्वरम या एकमार्गी प्रवासालाच १२ तास लागतात, हे समजल्यावर खरं तर मी तो डोक्यातून पूर्णतः काढूनही टाकला होता. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी (१३ आँगस्ट, २०१८) माझ्या एका मित्राने हे रुद्राष्टक मला WhatsApp वर पाठवलं. (हे तुलसीरामायणात समाविष्ट असून, लंकेत होऊ घातलेल्या युद्धाआधी श्रीरामांनी भगवान शंकराची केलेली प्रार्थना आहे. हे आठ कडव्यांचं आहे म्हणून याला ‘रुद्राष्टक’ म्हणतात). ते वाचून पुन्हा रामेश्वरमचा विचार सुरू झाला. १८ आणि १९ तारखेच्या शनि-रविवारच्या weekendला पाँडेचेरीला जायचा सर्वांचा plan होता. मंगळवारी तो (माझ्या अपेक्षेप्रमाणे) उधळला आणि मी लगेच १७ला रात्रीच्या, रामेश्वरमला जाणा-या बसचं तिकिट काढलं. रात्रीच्या प्रवासात (आणि तोही एकट्याने) मला अजिबात झोप येत नाही. म्हणून तेव्हा ऐकण्यासाठी गीतरामायणाचे audio tracks मी YouTube वरून download करून घेतले. ते स्वर्गसुख उपभोगत १८ ला सकाळी तिथे पोहोचलो.

 

देवळात आपण आंघोळ न करता जात नाही, तेव्हा रामेश्वरमला उतरल्यावर आंघोळ कुठे करायची, याची माहिती मी, पूर्वी इथे येऊन गेलेल्या अनेकांकडून काढली. सर्वांनी मला एकच सांगितलं, “तिथे hotel room घेण्याची काहीही गरज नाही. देऊळ समुद्राजवळ असूनही त्याभोवती २१ गोड्या पाण्याची कुंड आहेत. दर्शनाला जाणारे सर्वजण त्या कुंडाच्या पाण्याने आंघोळ करतात. ओलीताने देवळात प्रवेश मिळतो. तरीही ज्यांना ओली वस्त्र बदलायची आहेत त्यांच्यासाठी मंदिर प्रशासनाच्या खोल्या आणि locker ची सोय आहे”. ह्यातील अर्ध्याहून अधिक गोष्टी आजच्या तारखेला सत्य नाहीत. मंदिराभोवतीच्या कुंडातलं पाणी अजिबात गोडं राहिलेलं नाही, हे मी स्वतः चवीने पडताळून घेतलं आहे. ओलीताने आत प्रवेश आता दिला जात नाही. Locker संख्येने इतके कमी आहेत की weekend सोडाच, पण इतर दिवशी येणा-या लोकांनाही सेवा देऊ शकत नाही.

 

एक धार्मिक स्थळ म्हणून रामेश्वरमने माझी निराशा केली. ज्यांना कोणाला इथे यायची इच्छा होईल, कृपया कुंडाच्या पाण्याने आंघोळ करायला जाऊ नका. (काही परंपरा/पायंडे काळानुरूप सोडून देणंच योग्य असतं). Online hotel booking करा. प्रत्यक्ष तिथे पोहोचून hotel room घ्यायची असेल, तर नळाला समुद्राच्या खा-या पाण्याचा supply होत नसल्याची खात्री करून घ्या आणि मगच भाडं द्या. जेवणासाठी अनेक चांगली South Indian, North Indian हाॅटेल आहेत.

 

रामेश्वरममध्ये फिरण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. मुख्य म्हणजे धनुष्कोडी, जिथून लंकेला जाणा-या रामसेतूची सुरुवात होते. आज धनुष्कोडी ते श्रीलंका हे अंतर फक्त १६ किलोमीटर आहे. इथे जाण्यासाठी थोडा ज्योतिषशास्त्राचा आधार घ्या. (हो हो. मी बरोबरच बोलतोय). किंवा ७वीत भूगोलाच्या पुस्तकात शिकलेला भरती-ओहोटीचा धडा आठवा. भरतीच्या वेळी पोलीस इथे वाहनं आणि माणसांना जाऊ देत नाहीत. तेव्हा पौर्णिमा किंवा अमावास्येला आणि तेही पंचांगात ओहोटीची वेळ बघूनच planning करा. हे मी अशासाठी सांगतोय, कारण आपलं अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि उत्साहाने केलेले plan फसतात. सहलीची मजा घेता येत नाही. याशिवाय इथे अनेक मंदिरं आहेत.

 

मला माहितीये, हे article अपेक्षेपेक्षा जास्तच लांबतंय, पण याठिकाणी अब्दुल कलामांबद्दल सांगितलं नाही, तर त्यांच्याप्रती कृतघ्नता ठरेल, जी मी होऊ देणार नाही.

 

The Missile Man of India, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डाॅ. A. P. J. अब्दुल कलाम, यांचं जन्मगाव हेदेखील रामेश्वरमच. आपण सगळ्यांनीच त्यांना पाहिलंय, त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचलीयेत. त्यामुळे कलामसरांना न ओळखणारी व्यक्ती आपल्या देशात नसेल. सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘गुणसुमने मी वेचयलि या भावें, की तिने सुगंधा घ्यावे’, याच तत्परतेने त्यांनी या भरतभूची सेवा केली. या देशाच्या संरक्षणासाठी क्षेपणास्त्राची देणगी ते देऊन गेले. सच्च्या कर्मयोग्याला, त्याचे जीवितकार्य पार पाडत असतानाच मृत्यू येतो, या न्यायाने त्यांनाही २७ जुलै २०१५ रोजी IIM शिलाँग येथे तरूण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना भर कार्यक्रमात देवाज्ञा झाली. या देशाच्या विकासासाठी नेहमी तरूणांवर भरवसा ठेवणारे, आपल्यासारख्या असंख्य तरूणांचे Role Model असणारे कलाम, त्यांच्या चाहत्यांच्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर, एक चिरकाल दैदीप्यमान असा आदर्श ठेवून या जगाचा निरोप घेऊन गेले. त्यानंतर त्यांचे पार्थिव पुन्हा त्यांच्या जन्मगावी, रामेश्वरमला आणून, इस्लाम धर्मात सांगितलेल्या पद्धतीनुसार अन्त्यसंस्कार करून, पुरण्यात आले. त्यांच्या थडग्याभोवती आज त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभे आहे. येथे असलेली वेगवेगळी दालने त्यांच्या जीवनकालातले अनेक पैलू एकेक करून उलगडत नेतात. तिथे आत फोटो काढण्यास सक्त मनाई असल्याने मी त्या स्मारकाचे शब्दरूपातच वर्णन करून सांगतो.

 

सर्वात पहिलं दालन, कलाम एक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व, यावर प्रकाश टाकतं. तुम्ही आत जाता, तुम्हाला दारासमोरच डावीकडे कलाम उभे दिसतात. दोन्ही हातचे तळवे पोटासमोर बांधून ते उभे आहेत. केवळ चेहे-यावरील स्मितहास्याने ते तुमचं स्वागत करतात, आपणही आपल्या सवयीने हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करतो. पण ते करत नाहीत. क्षणभर आपण चक्रावून जातो. मग आपल्या लक्षात येतं. ते आपल्याला सोडून गेलेत. तो मेणाचा पुतळा आहे. मग तुमच्या अंगावर पहिल्यांदा रोमांच येतो. नंतर तुमचं लक्ष उजवीकडे जातं. तिथेही एका टेबलासमोर खुर्चीत ते बसलेले दिसतात. चेहे-यावर तसेच हास्य. आपली पुन्हा गफलत होते. ते दोन पुतळे साकारणा-या कलाकाराला मानलं पाहिजे राव ! तेवढीच उंची, तसाच सावळा वर्ण आणि डोक्यावरचे पांढरे केस. त्या दालनात, कलामांनी केलेले महत्त्वाचे विदेश दौरे, त्यादरम्यान त्यांना भेटलेली आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वं, या सर्वांची छायाचित्रे आहेत. यात ओबामा, जाॅर्ज बुश, राणी एलिझाबेथ, व्लादिमिर पुतीन अशांची मांदियाळी आहे. विदेशात त्यांचे झालेले मानसन्मान, त्यांना मिळालेले पुरस्कार इत्यादींची original प्रमाणपत्र इथे ठेवलेली आहेत.

 

तिथून पुढील दालन, Early Days of DRDO. DRDO मध्येच कलामांनी, ते ज्यासाठी जगभर ओळखले जातात, त्या missile वर संशोधन केलं. ते तरूणपणीचे, सदा उत्साही, सदा हसतमुख असे कलाम आपल्याला अनेक तसबीरीतून दिसत राहतात. Days in ISRO, इथे तुम्हाला इस्रोच्या पायाभरणीतील कलामाचा सहभाग चित्ररूपात दिसतो. विक्रम साराभाई, सतीश धवन यांच्यासोबतची छायाचित्रे पहायला मिळतात. भारताने विकसित केलेल्या अग्निबाणांच्या, Satellite Launch Vechicles (SLVs) 1:20 या प्रमाणातील प्रतिकृती येथे आहेत. पोखरणच्या स्फोटांमध्ये कार्यरत असलेल्या टीमचेही कलाम सदस्य होते. त्याचीही काही क्षणचित्रे येथे पहायला मिळतील.

 

त्यापुढचे दालन हे त्या संपूर्ण इमारतीच्या मध्यभागी आहे. तिथे कलाम सरांचे पार्थिव पुरलेले आहे. एखाद्या दर्ग्यामध्ये जशी मौलवीचा मृतदेह असणा-या कबरीवर चादर पांघरली जाते आणि फुलं वाहिली जातात, तेच संस्कार इथेही दररोज केले जातात. पण पर्यटकांना आत काहीही सामान नेण्याची परवानगी नाही, त्यामुळे तिथे फुलांचा ढीग न होता एक सुंदर पुष्पसजावट पहायला मिळते. इथे येणारा कोणीही व्यक्ती त्या कबरीपुढे नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. याच दालनाच्या भिंतीच्या बाजूला असणा-या show case मध्ये, शिलाँगला जाताना त्यांनी सोबत नेलेली सुटकेस आणि त्यात घेतलेल्या वस्तू मांडल्या आहेत. (आपण दोन दिवसांसाठी मामाच्या गावाला जाताना सुद्धा यापेक्षा जास्त वस्तू घेऊन जातो).

 

यापुढची दोन दालनं Kalam with Kids and Youth. कलाम लहान मुलांत, लहान होऊन कसे रमायचे, हे मी वेगळं सांगायला नको. लहान मुलांबरोबरचे असंख्य फोटो इथल्या भिंतींवर आहेत. आपल्यापैकी कदाचित खूप कमी लोकांना हे माहिती असेल की, अब्दुल कलामांनी पोलिओग्रस्त मुलांसाठी artificial पाय, भारतात तयार करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित केले होते. इथेच त्यांना मिळालेले सर्व नागरी पुरस्कार त्यांच्या पदकांसहित ठेवलेले आहेत.

 

सर्वात शेवटचे दालन नक्कीच तुमच्या काळजाचा ठाव घेते. यामध्ये फक्त दोन प्रसंग पुतळ्यांच्या रूपात उभे केलेले आहेत. पहिला प्रसंग, शिलाँगमधल्या त्यांच्या सभेतील तरूणांना संबोधून केलेले त्यांचे शेवटचे भाषण करतानाचा. आणि दुसरा प्रसंग, ते उभ्या उभ्या जमिनीवर कोसळले तो. हे पाहताना ख-या कलामप्रेमीच्या डोळ्यांतून आसवं गळाल्याशिवाय राहणार नाहीत.

 

KALAM ARCADE

 

हे आहे अब्दुल कलामांच मूळ राहतं घर. एवढ्या मोठ्या मोठ्या पदांवर काम करत हयात घावलेली व्यक्ती. आपल्यासारखा एखादा असता तर देशाविदेशात बंगले बांधून राहिला असता. पण इथे त्यांच्या शेजा-यासारखंच यांच पण घर, बैठं. सर्वसामान्य माणसासारखं. वास्तविक २०१५ जुलैच्या नंतर भारत सरकारने या घरावर एक माडी बांधून कलामांच्या सर्व खासगी वस्तू इथे संग्रही करून ठेवल्या आहेत. त्यांचे बालपणीचे, कुटुंबियासोबतचे असे अनेक फोटो इथे पहायला मिळतील. इथे तुमची नजर वेधून घेतो तो म्हणजे त्यांच्याजवळचा पुस्तकांचा खजिना. ४००० पेक्षा जास्त पुस्तकं त्या संग्रहात आहेत. DRDO चे गणवेश, ते वाजवायचे ती सरस्वती वीणा, कुराण, बायबल आणि श्रीमद्भवद्गीता. या माणसाने काय नाही केलं उभ्या आयुष्यात? देव न मानणा-या लोकांसाठीही रामेश्वरम आता तीर्थक्षेत्र झालंय, ते केवळ भातरत्न A. P. J. अब्दुल कलाम यांच्याचमुळे.

 

इथे संपते माझी रामेश्वरमची सहल.

 

त्यानंतर गोकुळाष्टमीच्या दिवशी चेन्नईतील Triplicane भागातल्या ‘पार्थसारथी’ श्रीकृष्णाच्या देवळात गेलो. तिथून, इथे नव्याने सुरू झालेल्या मेट्रो रेल्वेचा प्रवास करून ‘टी. नगर’ ला गेलो. वहाँ से सब के लिए जम के शाॅपिंग किया हैं । Be ready for the surprise !!!!!

 

शेवटी मला सांगायचं एवढंच आहे की, इथे मला एकाच वेळी वेगवेगळ्या त-हेची, स्वभावाची, वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसं भेटली. ज्या ठिकाणांबद्दल कधी फारसं वाचलंही नव्हतं, अशी ठिकाणं प्रत्यक्ष जाऊन बघता आली. आयत्या वेळी समोर आलेल्या अडचणीतून मार्ग काढण्याचं शिक्षण मिळालं. आयुष्यातली २१ वर्ष ‘मुंबई’ नावाच्या एका कोषात घालवल्यावर, तो फोडून एक नवीन फुलपाखरू होण्याची संधी मला या शहराने दिली. माझे स्वतःचे नवनवीन रंग, मलाच नव्याने दिसायला लागले. मी जर स्वतःसाठीच एवढा नवीन असेन, तर तिथे परत आल्यानंतर तुम्हाला कसा वाटेन याचीच ‘मला चिंता लागून राहिलेली ’ असते. (😁😁😁😁)

 

तेव्हा, आता एवढ्या प्रदीर्घ लिखाणानंतर चेन्नई शहरातल्या माझ्या अनुभवांचा दुसरा आणि शेवटचा भाग इथे संपवतो.

 

வணக்கம். नमस्कार. नमस्ते. प्रणाम. Regards.

 

  • हिमांशु दाबके

DISCLAIMER: Views expressed above are the author’s own.