Youth Speak

असा ही एक अनुभव​

रविवार होता म्हणून दुपारी झोपलो होतो. आई बाबा गावी गेले होते. एवढ्यात दारावरची बेल वाजली. झोपमोड झाली म्हणून जरा वैतागूनच दर उघडले. दरात 50 वर्षांच्या काकी उभ्या होत्या. माला वाटले त्या सेल्समन असतील. मी त्रासिक चेहर्‍याने विचारले, “काय आहे?”

त्या म्हणाल्या, “नमस्कार, माझे नाव राणी आहे. माझा भाऊ कोमात आहे. मालाडच्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहे. माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. म्हणून मी घरोघर मदत मागत फिरत आहे. तुम्ही काही मदत कराल तर फार उपकार होतील.”

अशाप्रकारच्या फसवणुकीचीच्या गोष्टी पेपरात वाचल्यामुळे माझा त्या काकींवर विश्वास बसला नाही. मी ‘सॉरी’ म्हणून दरवाजा बंद केला आणि हळूच खिडकीतून पहिले. त्या काकी शांतपणे निघून गेल्या. मी पण त्या गोष्टीचा फार विचार न करता परत झोपलो.

दोन दिवसांनी मालाडला ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. घरी परतताना राणी काकू दिसल्या. घाईघाईने कुठेतरी जात होत्या. माला त्यांच्याबद्दल संशय होताच म्हणून मी त्यांचा पाठलाग करू लागलो. काही वेळ चालल्यावर त्या एका माणसाशी बोलत उभ्या राहिल्या. बराच वेळ बोलत होत्या. मला घरी जायला उशीर होत होता म्हणून मी जायला निघालो. पण जाता जाता मोबाइलमध्ये त्या दोघांचा फोटो काढून घेतला.

दुसर्‍या दिवशी ऑफिस सुटल्यावर दादरला कॉलेजमधल्या एका मित्राकडे –दर्शनकडे- त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलो होतो. त्याच्या घरात त्याच्या बाबांच्या तरुणपणीचा फॅमिली फोटो होता. त्यातला एका बाईचा चेहेरा मला राणी काकूंसारखा वाटला. मी मित्राला जरा बाजूला ओढले आणि त्या बाईंबद्दल विचारले. तेव्हा त्याने मला पुढील गोष्ट सांगितली.

त्या बाईंचे नाव राणीच होते. त्या दर्शनच्या आत्या होत्या. ती एकूण 3 भावंडे. दर्शनचे बाबा हे राणी काकूंचे लहान भाऊ. वीस वर्षांपूर्वी त्या घरातून पळून गेल्या होत्या. कारण त्याचे एका मुलावर प्रेम होते पण वडिलांचा लग्नाला विरोध होता. शेवटी त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. वडिलांनी राणी काकूंशी संबंध कायमचे तोडले. या गोष्टीवर त्यांचे आणि राणी काकूंच्या मोठ्या भावाचे भांडण जाहले आणि त्यानेपण घर सोडले. दर्शनचे बाबा मात्र त्यांच्या आई-वडिलांसोबत राहिले, मात्र मनातून सतत त्यांना आपल्या मोठ्या भावाची आणि बहिणीची आठवण येत होती. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भाऊ-बहिणीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांना अपयशच आले. शेवटी त्यांनी तो नाद सोडून दिला.

मी ताबडतोब दर्शनच्या वडिलांना भेटलो आणि त्यांना राणी काकींचा फोटो दाखवला. त्या दर्शनच्या आत्याच होत्या. मी दर्शनच्या बाबांना त्यांच्याबद्दल सगळे संगितले. हॉस्पिटलचे नाव आणि पत्ता पण सांगितला. त्यांनी माझे आभार मानले आणि राणी काकींना भेटण्याचे कबूल केले. पार्टी संपली आणि आम्ही सगळेजण परत निघालो. मनातून मी त्या राणी काकींना मदत न केल्याची आणि त्यांच्या बद्दल वाईट विचार केल्याची खंत होती. पण त्यांना त्यांच्या परिवाराचे भेट घडवून दिली याचा आनंद होता.

नंतर कामाच्या व्यापात मी ते सारे काही विसरलो. काल (शनिवारी) दर्शनचा फोन आला. त्याने विचारले, “उद्या सकाळी घरी आहे का? बाबांना तुला भेटायचे आहे.” मी हो म्हणालो. कशासाठी भेटायचे असेल? असा प्रश्न मला पडला. कदाचित राणी ककींबद्दल काही माहिती मिळाली असेल असे मला वाटले.

आज सकाळी दर्शन, दर्शनचे बाबा राणी काकींना घेऊन घरी आले. मला मनातून अपराधी वाटत होते. सारखा तो प्रसंग आठवत होता. ते बसल्यावर मी प्रथम राणी काकींच्या पाया पडलो आणि त्यांची माफी मागितली. त्यांनी मला उठवले आणि प्रेमाने माझ्या चेहेर्‍यावरून हात फिरवला. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते. उलट त्यांनीच माझे आभार मानले. त्यांच्या बोलण्यातून समजले त्या ज्या माणसाला भेटत होत्या ते संजीवनी हॉस्पिटल मधले डॉक्टर होते आणि तसेच त्यांची गोष्ट समजली.

राणी काकूंनी घरातून पळून ज्याच्याशी लग्न केलं त्यांचा काही महिन्यांतर एका अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे राणी काकूंवर दु:खाचा डोंगरच कोसळला. वडिलांनी संबंध तोडलाच होता. एकदा त्या घरी परत गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना घरातून हाकलवून दिले. यावरून तिच्या मोठ्या भावाचे आणि वडिलांचे भांडण झाले होते. तो मोठा भाऊसुद्धा घरातून बाहेर पडला आणि आपल्या बहिणीसोबत राहू लागला. राणी काकूंनी तिच्या नवर्‍याचे दादरचे घर विकले आणि मालाडला एका चाळीत राहू लागल्या. त्या एका Private Company मध्ये नोकरी करू लागल्या आणि भाऊ एका बँकेत क्लार्क म्हणून काम करत होता. ते आनंदी होते. काही वर्षांनी त्यांचा भाऊ चाळीच्या पायर्‍या उतरत असताना पाय घसरून पडला आणि त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार बसला. चाळीतल्या माणसांनी ताबडतोब त्यांना संजीवनी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केले. तेथे डॉक्टरांनी सांगितले की ते कोमात आहेत. हे ऐकून राणी काकूंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा जगण्याचा एकमेव आधारपण निघून जात होता. त्यांचे मन अस्थिर झाले. त्यामुळे त्यांच्या कामात चुका होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना कंपनीतून काढून टाकले. आता भावाच्या आजारपणाचा खर्च कसं परवडणार? हा प्रश्न त्यांच्या समोर होता. त्यांनी स्वत:चे दागिने विकले. शेजारी, बँक जिथून जिथून शक्य होईत तिथून मदत घेतली. पण पुरेसे पैसे जमा करू शकत नव्हत्या. शेवटी त्यांनी घरोघरी फिरून मदत मागायची ठरवले आणि तशा करू लागल्या. दोन दिवसांपूर्वी दर्शनचे बाबा हॉस्पिटल मध्ये आले आणि त्यांनी राणी ककींची भेट घेतली. बर्‍याच  वर्षांनी आपला लाडका भाऊ भेटल्याने त्यांना खूप आनंद झाला. दर्शनच्या बाबांनी मोठ्या भावाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदार उचलली आणि त्यांचा बहिणीला घेऊन घरी आले. आज रात्रीच्या गाडीने राणी काकू गावी जाणार होत्या. कारण त्या त्यांचा भावासाठी गावाच्या देवीला नवस बोलल्या होत्या. तो पूर्ण करण्यासाठी जात होत्या. जाण्यापूर्वी त्यांना त्यांची आणि त्यांच्या धाकट्या भावाची भेट घडवणार्‍याचे आभार मानायचे होते.

आईने त्यांना जेवून जायचं आग्रह केला. जेवून झाल्यावर ते जायला निघाले. जाताना राणी काकींनी माझे हात हातात घेतले आणि म्हणल्या, “गावी गेल्यावर देवीकडे एकच मागणे मागेन, की जगात जर इतर कोणी राणी असेल तर तिला या मुलासारख्या देवमाणसाच्या घरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता दाखव……………….”

-सुधाकर अशोक तळवडेकर

DISCLAIMER: Views expressed above are the author’s own.